पोलीस प्रवाह न्यूज
कोल्हापूर : दि. १९ – येथील पंचाल बोर्डिंग संस्था कोल्हापूर, सोनार एकता फाउंडेशन आणि समाज कल्याण OBC विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य शासकीय योजना कॅम्प अतिशय सुंदर आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचाल बोर्डिंग संस्थेचे अद्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर) यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या कॅम्पच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली व समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचावेत हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून समाज कल्याण विभागाचे OBC समन्वयक अधिकारी दिपक शिंदे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, ओबीसी विभागामार्फत मिळणाऱ्या सवलती आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याबद्दल सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच AU बँकेचे क्लस्टर हेड विनोद गोइलकर यांनीही उपस्थित राहून वित्तीय साक्षरता आणि बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद दैवज्ञ बोर्डिंग चे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजाच्या प्रगतीसाठी अशा प्रकारच्या शासकीय योजनांच्या कॅम्पची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ध्वज महामुनी,सतीश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पोतदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रमोद पोतदार, दीपक औंधकर, संजय दैठणकर, सुरेश धर्माधिकारी, अनिश पोतदार, संदिप औंधकर,आणि निखील पोतदार यांचे विशेष सहकार्य लाभले.













































