पोलीस प्रवाह न्यूज
पुणे : दि. २४ – वसुधा फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘आपडी थापडी’ या बालकाव्यसंग्रहाचे आणि ‘वसुधाचे कथा वैभव’ या पुस्तकाचे प्रकाशन, कथा स्पर्धेतील बक्षीस वितरण तसेच राज्यस्तरीय भव्य बालकवी संमेलन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात उत्साहात पार पडले.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ. ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ॲड. अब्दुल शेख, पोलीस इन्स्पेक्टर व दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते कवी सिताराम नरके, शिक्षक काळुराम वाघचौरे आणि निसर्गकवी लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी बालसाहित्य आणि बालकवी संमेलनासारख्या उपक्रमांचे कौतुक केले. “कविता करणारा माणूस संवेदनशील असतो आणि संवेदनशील माणूस माणसांवर प्रेम करतो,” असे मत ॲड. अब्दुल शेख यांनी व्यक्त केले.
वसुधा फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. वसुधा वैभव नाईक यांनी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्याची माहिती दिली. बालकांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या संमेलनात सुमारे ३० बालकवींनी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. सर्व बालकवींचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कथा स्पर्धेच्या परीक्षणासाठी शशिकांत सुतार, दिलीप घाटे, राजेश्वर हेंद्रे आणि रामदास तांबे यांनी योगदान दिले. कथा स्पर्धेसाठी योगेश हरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन गजानन उफाडे यांनी केले, तर शीतल शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश हरणे, गौरव पुंडे, श्रीराम घडे, कोमल नाईक, शीतल शर्मा, सायली ढेबे, मयुरी पुंडे आणि राधिका परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.











































