पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७- धर्मरक्षा, समाजसेवा, राष्ट्रसेवा हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून समाजसेवा, संस्कार, सहयोग याकरिता कटिबद्ध असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जनसेवा सहकारी संस्था आयोजित रायगड जिल्ह्यातील गोरक्षकांना आणि त्यांच्या कार्याला उत्साह व प्रेरणा मिळावी या उद्देशाने संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा हेमा दिंगबर मानकर यांच्या संकल्पनेतून धर्मरक्षण, गोसंवर्धन आणि समाजसेवेसाठी काम करणाऱ्या गोरक्षकांसाठी १६ ऑगस्ट रोजी माणगाव येथे रायगड जिल्हास्तरीय ‘गोरक्षकांचा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला कालीपुत्र धर्मगुरू श्री. कालीचरण महाराज, मानद पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री. शिवशंकर स्वामी, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. मारुती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धार्मिक व गोरक्षा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा हेमा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष आनंद राजभर, सल्लागार राहुल तळकर, संदीप म्हामूणकर, प्रशांत नांदगावकर, सचिव प्रकाश मनवल, विशाल खातू, प्रसाद जाधव, निखिल साळुंखे, प्रशांत सकपाळ आणि संस्थेच्या महिला सदस्या निलिमा भोसले, अश्विनी खरे, मानसी गुडेकर, निलम काळे, स्नेहल म्हामुणकर, मंजुषा जोशी, कल्पना विचारे, संगीता हार्डीकर, प्रगती पाटील या सर्व सदस्य पदाधिकारी आणि मावळा प्रतिष्ठान माणगाव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या सन्मान सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, तळा, मुरुड, अलिबाग, पेण, पनवेल, उरण, नागोठणे, पाली या तालुका व शहरांतील सुमारे २०० गोरक्षक आणि विविध गोसेवा सामाजिक संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना कीर्तनकार मारुती महाराज यांनी गोपालन, गोसेवा आणि गोसेवेचे हिंदू धर्मातील महत्त्व विविध हिंदू धर्मातील ग्रंथांचे दाखले देत स्पष्ट केले. मानद पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री. शिवशंकर स्वामी यांनी गोरक्षकांना केलेले मार्गदर्शन बहुमोल ठरले. धर्मरक्षण, गोरक्षण, गोसंवर्धन यामध्ये गोरक्षकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणारा गोवंश, त्यावेळी होणाऱ्या कायदेशीर कारवाया तसेच गोवंश तस्करांपासून गोरक्षकांना निर्माण होणारे संभाव्य धोके आणि गोवंश तस्करांना कायद्याच्या जाळ्यात कसे अडकवले जाऊ शकते, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या गोरक्षक सन्मान सोहळ्यात कालीपुत्र धर्मगुरू श्री. कालीचरण महाराज यांचे जहाल धार्मिक भाषण उपस्थित प्रत्येक गोरक्षकाच्या अंगात शहारे आणणारे ठरले. सनातन हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदू धर्माची व्याख्या, गाय आणि माय यांचे महत्त्व, हिंदू धर्मावर इतर धर्मांकडून होणारे अन्याय-अत्याचार, देशी गोवंशाचे महत्त्व, हिंदू धर्म आणि राजकारण तसेच सनातन धर्माचे स्पष्टिकरण धर्मगुरू कालीचरण महाराजांनी केले.धर्मावर होणारे अत्याचार मवाळ भूमिकेने पाहू नका, जहाल व्हा, हिंसेला उत्तर अहिंसा नाही तर हिंसेने उत्तर द्या, अशा स्वरूपाचे जहाल धार्मिक मनोगत धर्मगुरू कालीचरण महाराजांनी व्यक्त केले. तसेच गोवंश हत्या आणि गोसंवर्धनाबाबतही त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी सभागृहात रोमांचकारी वातावरण निर्माण झाले होते. ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘नमो पार्वती पती हर हर महादेव’ या घोषणांनी तसेच ओंकारनाद आणि शंखनादाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.असा हा रायगड जिल्ह्यातील गोरक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.













































