पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २५- श्रावण महिन्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राची शिवधारा’ या विशेष उपक्रमांतर्गत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिराचा गौरव केला आहे. याबद्दल हरिहरेश्वर देवस्थान संस्थान, ग्रामपंचायत आणि समस्त हरिहरेश्वर ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री क्षेत्र हरिहरेश्वरचा उल्लेख आढळतो. ठाण्याच्या निर्मळपासून ते कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर आणि सिंधू सागरापासून ३९ मैलांपर्यंतचा विस्तीर्ण परिसर हरिहरेश्वरचा मानला जातो.अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या या भूमीला ‘देवघर’ असेही संबोधले जाते.

विशेष म्हणजे, मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट आणि कोकणातील हरिहरेश्वर देवस्थान यांचा संबंध अत्यंत जुना, पिढ्यानपिढ्यांचा आणि घनिष्ठ आहे.अटकेपार झेंडे लावणारे आणि अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करणारे मूळ श्रीवर्धन येथील पेशवे (भट) घराण्याचे हरिहरेश्वर हे कुलदैवत आहे.
अशा या ऐतिहासिक व अध्यात्मिक वारसा लाभलेल्या तीर्थक्षेत्राची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने हरिहरेश्वरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासंदर्भात श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थानचे सचिव व खजिनदार सिद्धेश पोवार यांनी मंदिर संस्थान, देवघर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.











































