पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २० माणगाव तालुका सकल मराठा समाजातर्फे गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी क्षत्रिय मराठा भवन माणगाव याठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती देण्यात आली.
शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम व अद्वितीय युद्ध कौशल्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा उद्देशाने सकल मराठा समाज माणगाव तालुका यांच्यावतीने ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन क्षत्रिय मराठा भवन माणगाव याठिकाणी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन तलवार, ढाल, भाला, कट्यार, नाणी तसेच विविध ऐतिहासिक शस्त्रांची माहिती तज्ञ् मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थी, शिक्षक व शिवप्रेमी नागरिकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या स्तुत्य उपक्रमाचा आयोजकांचा हेतू होता. सकल मराठा समाज बांधवानी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी किल्ले रायगड येथे जाऊन तेथून शिवज्योत घेऊन ती माणगाव शहरातून मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन शिवज्योत क्षत्रिय मराठा भवन, माणगाव येथे आणली. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी आयोजकांनी माणगावात शिवज्योत यात्रा काढली. या शोभा यात्रेत सकल मराठा समाज बांधव – भगिनी यांच्याबरोबरच कामेरकर स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच माणगावधील शिवभक्त सहभागी झाले होते.

क्षत्रिय मराठा भवन माणगाव याठिकाणी या शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरवातीला क्षत्रिय मराठा समाज, माणगाव/तळा अध्यक्ष राजू मोरे यांनी सपत्नीक शिवप्रतिमेचे दुग्धाभिषेक व पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही शिवरायांचे यशोगाथा सांगितली. या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास माणगाव तालुक्याचे प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप, पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीचे सीएसआर प्रमुख कुलदीप पुरंदरे, माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, कामेरकर स्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, श्रद्धा इंग्लिश स्कुल माणगाव मुख्याध्यापिका बीजाक्षी रॉय, शुभम पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. या उत्सवास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सकल मराठा समाजातर्फे स्वागत करण्यात आले. या समाजातर्फे शिवजयंतीनिमित्त भरविण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाची पाहणी माणगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिवप्रेमी नागरिकांनी करून सकल मराठा समाजाने एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले. या आयोजनात सुरज कडू, संजोग मानकर, स्वप्निल वाघ, महेंद्र कनोजे, अमोल माने, अनिल चव्हाण, मिलिंद शेलार, नितीन शेलार, निलेश पवार, प्रतिक गायकवाड, अजय शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली.





































