पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- विळे येथे शिवसेनेची प्रचार जाहीर सभा मोठ्या दिनांक ३१ जानेवारी रोजी संपन्न झाली. यावेळी मंत्री गोगावले यांनी ॲड राजीव साबळे यांच्या वर शब्दांचा घणाघात करत आमचे उमेदवार कानाकोपऱ्यात फिरू शकतात जोर गावात चालत जाऊ शकतात. आमच्या उमेदवारांना बोलता नाही आले तरी चालेल पण लोकांच्या कामा साठी रात्रंदिवस धावता नक्की येईल. तुमचे काय ? मंत्री भरत शेठ गोगावले यांनी नॅपकिनच्या जादूचे रहस्य सांगत केला विरोधकांवर घणाघात केला. निवडणुकीदरम्यान जो पक्षाशी गद्दारी करेल त्याची गाठ माझ्याशी असेल.

आगामी जिल्हा परिषद रायगड व पंचायत समिती माणगाव निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निजामपूर जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश नलावडे तसेच पाटणूस पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार विलास शिंदे यांच्या प्रचारार्थ विळे येथे शिवसेनेची भव्य जाहीर सभा शिवसेनेचे उपनेते व मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांचा जोश आणि जनतेच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास पाहता ही सभा शिवसेनेच्या विजयाची नांदी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या वतीने सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी उ.बा.ठा गटाच्या सणसवाडी येथील महिला शाखाप्रमुख मुक्ता बामूगडे यांनी अनेक महिला भगिनींसह मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पाटणूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक येरूणकर, कुणाल मोरे, वैभव महामुनकर, प्रथमेश महामुनकर व मारुती मालुसरे यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले, कि “ही निवडणूक म्हणजे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. शिवसेनेने दिलेले उमेदवार हे गरीब घरातले, शेतकऱ्यांचे कष्टकरी पुत्र आहेत. तरुणांना संधी देणे हाच शिवसेनेचा खरा ध्यास आहे.”
ते पुढे म्हणाले की, “निवडून आल्यावर उमेदवारांनी जमिनीवर राहून लोकांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य आहे. हीच शिवसेनेची शिकवण आहे.” विरोधकांवर कडाडून टीका करताना मंत्री गोगावले म्हणाले, “विरोधक म्हणतात आमच्या उमेदवाराला बोलता येत नाही. ठीक आहे! आमचा उमेदवार शिवसेनेचा आहे, त्याला लोकांसाठी चालता येतं. आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे आणि जनताच विरोधकांना त्यांची जागा दाखवेल.” स्थानिक मतभेदांबाबत स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी सांगितले की,“पक्षामध्ये स्थानिक मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण पक्षाशी गद्दारी करण्याचा प्रयत्न कोणी केला तर गाठ थेट माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा.” यावेळी त्यांनी त्यांच्या ‘नॅपकिनच्या जादू’वर भाष्य करत सांगितले की,“माझ्या नॅपकिनची जादू म्हणजे त्यामध्ये जनतेचे प्रेम आणि जनसेवेचा विचार आहे. हाच विचार घेऊन आम्ही जनतेत फिरतो.”
शिवसेनेचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत मंत्री गोगावले म्हणाले की,“विरोधकांना टिकेतून नाही तर विकासकामांतून उत्तर द्यायचे आहे.” यासोबतच ना .भरत सेठ गोगावले यांनी माणगाव येथील एमआयडीसीमध्ये प्रत्येक स्थानिक तरुणाला रोजगार मिळवून देण्याची ठाम हमी दिली. सभेच्या शेवटी नागरिकांना आवाहन करताना मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले,“पाच वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी आहोत. पाच वर्षांतून एकदा तुम्ही आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद द्या आणि येत्या ७ तारखेला शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.”

या जाहीर सभेस शिवसेना नेते ज्ञानदेव पोवार, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, निजामपूर माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे, उपतालुकाप्रमुख सुधीर पवार, विभागप्रमुख मनोज सावंत, माजी उपसभापती आप्पा म्हामुणकर, वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, युवासेना अधिकारी अच्युत तोंडलेकर, प्रसाद गुरव, सुवर्णा चौरे, प्रफुल घरटकर, रमेश देशपांडे, अशोक साळुंखे, अनिल मोरे माणगाव विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, युवा शिवसैनिक, महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उमेदवार अविनाश नलावडे म्हणाले की, भविष्यात निजामपूर विभागात शिवसेना पक्षातर्फे सुसज्ज हॉस्पिटल व महाविद्यालय उभारणार. बहुतांशी तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी मुंबई, सुरत ठिकाणी आहेत. भविष्यात येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून जनतेची सेवा करण्यासाठीच ही निवडणूक लढवित आहे. मंत्री भरत गोगावले यांनी या भागातील प्रत्येक गाव व वाडीवर विकासकामे केली आहेत. विरोधकांनी कितीही वल्गना करू द्या. आपण एक शिवसेना कुटुंब म्हणून येत्या ७ तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस मतदान करा, असे आवाहन उमेदवार अविनाश नलावडे यांनी जनतेला केले.




































