पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ७ – माणगावकरांसाठी मंगळवार हा अपघाताचा वार ठरला. दि. ६ मे रोजी माणगाव शहरात मोर्बा रोडवर उपजिल्हा रुग्णालयासमोर संध्याकाळी ४ वा. च्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरने तीन जणांचा जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नुकताच घडलेला असतानाच रात्री ८.३० वा. च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ इको गाडीने पाठीमागून अँक्टिव्हा दिलेल्या धडकीत एका तरुणीचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत.
भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको गाडीची अँक्टिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. ६ मे रोजी रात्री ८. ३० वा. माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल कोकण सम्राटच्या जवळ मुंबई – गोवा महामार्गावर मुगवली फाट्याजवळ एका अज्ञात राखाडी रंगाच्या मारुती इको गाडीवरील अनोळखी चालक याने त्याच्या ताब्यातील गाडी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे अतिवेगात चालवीत घेऊन येत असताना अपघात ठिकाणी आल्यावर समोरून येणाऱ्या होंडा अँक्टिव्हा दुचाकी क्र. एम. एच. ०६ सी.आर.५९२३ या गाडीवरील चालक वैभव सुभाष भोजने (वय-२५) रा. देवळी कोंड याने उजव्या बाजूचा इंडिकेटर देऊन उजव्या बाजूला वळत असताना इको गाडीचा चालक आरोपी याने अँक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सलोनी संजय भोसले (वय -१८) रा. देवळी कोंड या तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय-२५) व जान्हवी संतोष उंडरे (वय -१८) दोन्ही रा. देवळी कोंड ता. माणगाव हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.


































