पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी-चिंचवड : दि. २९ – चिखली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरीविरोधात प्रभावी कारवाई करत ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ९५ हजार किंमतीच्या ४ मोटारसायकली व १ ऑटो रिक्षा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राज संतोष बापर्डेकर (वय २३, रा. शिवपार्वती हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली, पुणे) व शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे) अशी आहेत.
पोलीसांनी दोघांकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक ४१०/२०२६, ४९८/२०२६, ४७२/२०२६, ४७४/२०२६ आणि ३२२/२०२६ या भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असलेल्या ५ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपींकडून ४ मोटारसायकली व १ ऑटो रिक्षा, असा एकूण २.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यापैकी राज संतोष बापर्डेकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी १२ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
तसेच शंकरसिंग समंदरसिंग टाक हा देखील सराईत गुन्हेगार असून तो हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चार गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहे. संबंधित सर्व गुन्ह्यांमध्ये त्याची नोंद असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.












































