पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- रायगड जिल्ह्यातील राजकारणाला नव्या वळणावर आणणारी घटना घडली असून रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तब्बल ६५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा माणगाव सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांची लढत आता न्यायालयीन पातळीवर पोहोचली आहे.
खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर २६ डिसेंबर रोजी शिवसैनिक मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली होती. ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे आपली राजकीय प्रतिमा मलिन झाली आणि जनतेत चुकीचा संदेश गेला असा दावा करत तटकरे यांनी थोरवे यांच्या विरोधात ६५ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
या प्रकरणाची पहिली सुनावणी माणगाव सत्र न्यायालयात पार पडली असून पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. तटकरे यांचे वकील ॲड. प्रदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. एकीकडे हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेली संवेदनशील परिस्थिती आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांमधील थेट न्यायालयीन संघर्ष यामुळे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये तीव्र राजकीय ध्रुवीकरण दिसून येत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, या प्रकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोपांची लढत आता न्यायालयात पोहोचल्याने दोन्ही बाजूंकडून राजकीय रणनीती अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंगेश काळोखे हत्या प्रकरण, त्यानंतर झालेली राजकीय वक्तव्ये आणि आता दाखल झालेला अब्रूनुकसानीचा दावा या सर्व घटनांमुळे रायगड जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या या दाव्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी बेछूट आणि बिनबुडाचे निराधार आरोप – प्रत्यारोप करुन राजकीय चर्चेत किंवा समाज माध्यमातून खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आटापिटा करून फुशारक्या मारणार्या आणि बेताल वक्तव्ये करणारे नेते आणि गाव पुढार्रयांना निश्चितच पायबंद बसेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खासदार सुनील तटकरे हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत अशी चर्चा आहे. असे असले तरी खासदार सुनील तटकरे यांनी हा दावा दाखल करुन योग्यच केले आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले.









































