पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील यशस्वी कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांनी ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे दिलेल्या योगदानाचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसील कार्यालय, माणगाव, जि. रायगड येथील सभागृहात ‘सेवा संकल्प अभियान शिबिर’ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील ४५३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन व मुख्य कार्यक्रम रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री ना.भरत गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विपिन लोकरे यांनी केले.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, इतर लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांशी संबंधित एकूण ४५३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचे लाभ व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच व्यासपीठावर ६८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते लाभ व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.महसूल विभागामार्फत नॉन-क्रीमीलेअर दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल (अधिवास) दाखला, गाव नमुना उतारे, जन्म-मृत्यू नोंद व शिधापत्रिका यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व बेबी केअर किट; उपजिल्हा रुग्णालयामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र; तसेच नगरपंचायत कार्यालयामार्फत अतिक्रमण नियमानुकूल सनद, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी-२.०), शबरी आदिवासी घरकुल योजना आणि नागरिकांसाठी जन्म-मृत्यू सनद यांसारख्या सेवांचा समावेश होता.
पंचायत समिती कार्यालयामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला व कर आकारणी नोंदवही उतारा; तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत महिला शेतकरी प्रमाणपत्र व कृषी यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर अनुदान; तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आयुष्मान भारत कार्ड; तसेच एस.टी. महामंडळाच्या माणगाव आगारामार्फत एनसीएमसी (NCMC) कार्डचे वितरण करण्यात आले
या कार्यक्रमावेळी पालकमंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी, माणगाव यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे (भा.प्र.से.), अपर जिल्हाधिकारी रायगड आणि उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास सर्व संबंधित विभागांचे तालुकाप्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ थेट आणि जलद गतीने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, माणगाव तालुक्यातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.













































