पोलीस प्रवाह न्युज
मुंबई गोवा महामार्गावर पाणी
माणगाव, दि. १८- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ‘रेड अलर्ट’नंतर निसर्गाने अक्षरशः धुमाकूळ घालत सततच्या पावसाचा मारा केला. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
माणगाव शहरासह निजामपूर परिसरात पावसाचा प्रचंड रोष जाणवला. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बोरघर गावात मुसळधार पावसाच्या तडाख्याने ट्रान्सफॉर्मर निकामी झाला. त्यामुळे तब्बल २४ तास वीजपुरवठा खंडित राहिला होता. अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर रविवारी सकाळपासून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील शाळांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
माणगांव तालुक्यातील गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काळ नदी, गोद नदी तुडुंब भरून वाहत आहे. तालुक्यातील अनेक खेडेगावांजवळ पाणी तुंबले असून काही ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूर्ण जलमय झाल्याचे चित्र या सतत पडत असलेल्या पावसामुळे दिसत असून इंदापूर, निजामपूर व सर्व ग्रामीण भागातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने माणगांव तालुकामधील असणाऱ्या शाळेतील विध्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.
तसेच निजामपूर बस स्थानकाजवळ गुडघाभर पाणी साचून संपुर्ण रस्ता जलमय झाला आहे. त्यातूनच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना ये जा करावी लागत आहे. तसेच रिळे पाचोळे गावाकडे जाणारे रोडला गोद नदीचे पाणी नद्यांच्या बाजूला असलेली शेती पूर्णतः पाण्याखाली आली आहे. पुणे दिघी महामार्गावर पाणोसे गावच्या हद्दीत रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच शिरवली गावच्या हद्दीत पुराचे पाणी साचले असून केळगण गावच्या हद्दीत दरड कोसळली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माणगाव शहरात मोर्बा, कचेरी, बामणोली रोड सुद्धा जलमय झाले होते.
शेतकरी वर्गाला मात्र मोठा फटका बसला आहे. भातशेती, भाजीपाला तसेच फळबागांचे पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रशासनाने आपत्कालीन पथक सतर्क ठेवले असून पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





































