पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २७ – एका पंधरा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आला असून या घटनेने माणगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या घरोशीवाडी येथे उतेकर कुटुंबीय उन्हाळी सुट्टी निमित्त आले असताना निधी हि पंधरा वर्षीय मुलगी सोमवार दि. २५ मे रोजी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास वडीलांच्या मोबाईल वरती बोलत घरातून बाहेर पडली. ती परत घरी परतलीच नाही. सोमवार रात्री पासून तिचा तपास सुरू होता. अखेर बुधवार दिनांक २७ मे रोजी घरोशीवाडी च्या जंगलात एका मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले त्यानुसार निधी हिच्या वडिलांना बोलावण्यात आले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
निधी राकेश उतेकर ही आपल्या कुटुंबासोबत विलेपार्ले येथे राहत होती. ती इयत्ता ९ वी पास होऊन उन्हाळी सुट्ट्या पडल्यामुळे ८ दिवसांपूर्णी आई, वडील भावासोबत गावी आली होती. ती विलेपार्ले येथील सेंट जेव्हियर्स शाळेत शिकत होती.
जंगलभागात निर्जन स्थळी निधी हिचा मृतदेह सापडला प्राथमिक तपासात तिच्या अंगावर झालेल्या जख्मा पाहता हा खुन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून तातडीने माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फाॅरेन्सीक टिम व श्वान पथक घटनास्थळी पोहचले असून माणगाव पोलीस सखोल तपास करत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो.











































