पोलीस प्रवाह न्यूज
श्रीवर्धन : दि १६ – रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायत रानवली येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी संपूर्ण गावाने एकजुटीने श्रमदान करून ‘स्वच्छ रानवली, सुंदर रानवली’चा नारा दिला.
शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील सार्वजनिक रस्ते, गटारे, मंदिर परिसर आणि कोपरान्-कोपरा स्वच्छ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, त्याला रानवली ग्रामपंचायतीने कृतीतून दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून प्रबोधन या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले ते स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘प्लास्टिक बंदी’ विषयावरील पथनाट्य. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्लास्टिक कचऱ्याचे निसर्गावर होणारे घातक परिणाम मांडले. “प्लास्टिक हटाव, पृथ्वी वाचवा” आणि “स्वच्छ रानवली, सुंदर रानवली” अशा घोषणांनी शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव परिसर दणाणून सोडला होता.
या अभियानाचे नेतृत्व सरपंच सुरेश मांडवकर आणि उपसरपंच आत्ताउल्ला जळगावकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने , रायगड जिल्हा परिषद रानवली मराठी शाळेचे मुख्याध्यापक भिकू पांगारकर यांच्यासह समाजसेवक राजू जाधव, विठोबा हावरे, भीमराव जोशी, भाविका जोशी, आयुब खान, ताजउद्दीन खान, रुकमुद्दीन सोगे या मान्यवरांनी हातात झाडू घेऊन श्रमदान केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या मोहिमेला एका लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते.ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या जनजागृतीचे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून कौतुक होत आहे.
यावेळी सरपंच सुरेश मांडवकर म्हणाले की, “प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रानवली गावाला केवळ स्वच्छच नाही तर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आजच्या या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत नवीन चैतन्य निर्माण झाले असून हे अभियान आम्ही सातत्याने राबवू.”




































