पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- तालुक्यातील सुरव तर्फे निजामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि. १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीही शाळेत पहिल्यांदाच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांसाठी एक भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेत पहिल्यांदाच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकीने शाळेत आगमन झाले. गुलाब फुले आणि ओवाळणी करून त्यांचे आपलेपणाने स्वागत व्यवस्थापन समिती अध्यक्षा तेजस्विनी करकरे यांनी केले.

पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांसाठी मनोहारी असे ‘पहिले पाऊल’ हे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात कागदावर पाऊलांचे ठसे घेण्याची अनोखी प्रथा ठेवण्यात आली. जी या मुलांसाठी नव्या शैक्षणिक वाटचालीची नांदी ठरली. शाळेच्या पहिल्याच दिवशीच मुलांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप प्रमुख मान्यवरांकडून करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता वाढवळ मॅडम यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून स्वागताची भावना व्यक्त केली. त्यांनी यंदापासून इयत्ता पहिली पासूनच CBSC पॅटर्न अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती दिली. ज्यामुळे शिक्षणाच्या दर्जात वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शाळेच्या मुलांना आणि पालकांना आनंदित होण्याचे कारण आहे.
विद्यार्थ्यांना मिष्टांन्न भोजनाचा पोषण आहार देऊन कार्यक्रमाच्या विशेषत्वात भर पडली. सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक प्रदीप आडित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नमिता लहाने, रसिका लहाने, मंजुळा लहाने, अंगणवाडी सेविका पल्लवी कोळेकर, रेखा लहाने आणि दीपिका लहाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमातील उत्साह, आनंद आणि एकात्मता पाहून, आपण असे म्हणू शकतो, की शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्याला हा दिवस उज्ज्वल करणारा ठरू शकतो.





































