पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- शिवसेना पक्षाच्या माणगाव तालुका प्रमुखपदी रमेश पांडुरंग मोरे यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचे अधिकृत पत्र देण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे माणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने रमेश मोरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रमेश मोरे यांचा माणगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून दांडगा जनसंपर्क आहे. ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये त्यांचा सातत्याने संपर्क असून, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रियपणे काम केले आहे. त्यांच्या या जनसंपर्काचा आणि संघटनात्मक अनुभवाचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नुकतीच रमेश मोरे यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी माणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये व्यापक जनसंपर्क साधला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांशी असलेले त्यांचे संबंध यामुळे त्यांना तालुक्यातील राजकीय परिस्थितीची चांगली जाण असल्याचे मानले जाते.
रमेश मोरे यांच्या पत्नी आरती मोरे या जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या माध्यमातून माणगाव तालुक्यात विविध विकासकामांना चालना मिळाली. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे केली आहेत. रमेश मोरे हे मंत्री भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक म्हणूनही माणगाव तालुक्यात ओळखले जातात. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेला त्यांचा संपर्क आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी असलेले संबंध यामुळे त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात माणगाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे तसेच बूथ आणि गावपातळीवरील संघटना अधिक मजबूत करणे, अशी प्रमुख आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहेत.
दरम्यान, रमेश पांडुरंग मोरे यांची माणगाव तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर माणगाव तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी, समर्थक तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष भेटीतून त्यांना पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.












































