पोलीस प्रवाह न्युज
पिंपरी-चिंचवड, दि. ३०- संत तुकारामनगर-सुकवानी सोसायटी परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नावर आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने “कचरा आमचा नाही” असे सांगत एकमेकांकडे बोट दाखवण्याचा खेळ तातडीने बंद करावा; कारण हा कचऱ्याचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे!
सुकवणी कॅम्पच्या मागील बाजूस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेवर अनेक दिवसांपासून कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून नागरिकांना दररोज या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ज्या परिसरात नागरिक राहतात, मुले शाळेत जातात आणि रुग्णालये, महाविद्यालये व शासकीय कार्यालये आहेत, त्याच परिसरात कचरा सडत असताना प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे? या प्रश्नासाठी पिंपरी-चिंचवड युवा सेनेचे महानगर प्रमुख संतोष म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.
महापालिकेचा कचरा या ठिकाणी पडत असल्याच्या तक्रारीनंतर म्हात्रे यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र दिले. खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर महापालिकेचा कचरा उचलण्यात आला.
मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा अद्यापही जागेवरच पडून आहे.
यानंतर म्हात्रे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी एन. एम. नासिर साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. त्यानंतर आज पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रदीप टेंगळ यांची त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांचा प्रश्न मांडण्यात आला.
मात्र, “हा कचरा कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आहे, आम्ही उचलणार नाही. त्यांना पत्र देऊ किंवा तुम्ही त्यांना भेटा,” अशी भूमिका महापालिका प्रशासनाकडून मांडण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
यावर संतोष म्हात्रे यांनी प्रशासनाला संतप्त सवाल केला आहे
“कचरा कोणाचा आहे, याचा वाद तुम्ही तुमच्या कार्यालयात बसून सोडवा; पण त्या वादाची शिक्षा आम्हाला का? आम्ही नागरिक आहोत, तुमच्या प्रशासनिक हद्दींच्या वादात अडकलेले आकडे नाही! आमच्या घरात दुर्गंधी येते, आमची मुले या रस्त्याने जातात, आजूबाजूला रुग्णालये आणि शाळा आहेत. आमच्या आरोग्याला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?”
“महापालिका कॅन्टोन्मेंटकडे बोट दाखवते आणि कॅन्टोन्मेंट महापालिकेकडे बोट दाखवते. दोन्ही प्रशासनांनी बोट दाखवण्याऐवजी कचरा उचलण्यासाठी हात पुढे करावेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नात ‘हा कचरा माझा नाही’ ही भूमिका कोणत्याही प्रशासनाला शोभणारी नाही.”
या परिसरात संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगर तसेच स्वर्गंगा, विनीत प्लाझा, गंगास्काय, सुकवळी, गेरा, म्हाडा आदी सोसायट्या आहेत. परिसरात वल्लभनगर एसटी स्टँड, वल्लभनगर मेट्रो स्टेशन, कलासागर हॉटेल, एसबीआय बँक, आरटीओ कार्यालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, वाय. सी. एम. रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज तसेच अनेक शाळा-महाविद्यालये आहेत.
“एवढ्या संवेदनशील परिसरात कचरा सडत असताना प्रशासनाने अजून किती दिवस कागदपत्रांची देवाणघेवाण करायची? नागरिकांना दुर्गंधी सहन करायला लावून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आम्ही शांतपणे पाठपुरावा केला, संबंधित अधिकाऱ्यांना पत्रे दिली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या; आता मात्र केवळ आश्वासन नको—प्रत्यक्ष कचरा हटवलेला पाहिजे,” असा स्पष्ट इशारा संतोष म्हात्रे यांनी दिला.
“नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ‘कचरा कोणाचा?’ हा प्रश्न आम्हाला नको; ‘कचरा कधी उचलणार?’ याचे उत्तर प्रशासनाने द्यावे!”
महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने संयुक्त पाहणी करून संपूर्ण कचरा हटवावा आणि भविष्यात या ठिकाणी कचरा साचणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर पुढील तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा संतोष म्हात्रे यांनी दिला.
संतोष म्हात्रे
महानगर प्रमुख, युवा सेना
पिंपरी-चिंचवड शहर












































