पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४-काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शेतकरी नेते पंकज तांबे यांनी आपल्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांसह दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी मुंबई येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व म्हाडा अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शना खाली पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून माणगाव सह दक्षिण रायगड मध्ये भाजपची निश्चितच ताकद आता वाढणार आहे.
यावेळी माणगाव तालुक्यातील निजामपूर, विळे, पळसगाव, इंदापूर भागातील शेकडो सहकारी कार्यकर्ते मुंबई येथे पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात दाखल झाली होते. यावेळी स्वप्निल शिर्के, वावे दिवाळीत ग्रामपंचायत माजी सरपंच शरद कदम, निळज ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमोद जाधव, शिरवली ग्रामपंचायत माजी सरपंच विजय नलावडे, सणसवाडी ग्रामपंचायत माजी सदस्य सय्याजी नलावडे, एडवोकेट. रुपेश वाढवळ, सुनील अर्बन, तुम्हाला अर्बन, योगेश ढवळे, मयूर अर्बन, आनंद मोरे, गजानन चव्हाण, प्रकाश शिंदे, प्रताप कडू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये उत्स्फूर्तपणे प्रवेश केला.
यावेळी भाजप नेते बापूसाहेब सोनगिरे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सिताराम उभारे, जिल्हा चिटणीस गोविंद कासार, भाजप तालुका अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर,युवा मोर्चा सरचिटणीस अरविंद उभारे गोरेगांव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर,नागाव सरपंच यशवंत कासरेकर,मारुती कासरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक प्रगती करीत आहे. पंकज तांबे यांच्या पक्षप्रवेशा मुळे निश्चितच माणगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे. हा विश्वास व्यक्त करीत सर्वांनी एकत्रपणे काम करा आणि पक्ष अधिक बळकट करा. अशी अशा व्यक्त केली. तर आ. प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, दक्षिण रायगडमध्ये त्या पक्षप्रवेशा मुळे निश्चितच भाजपाची ताकद वाढत आहे. सर्वांनी एकत्र मिळून पक्ष संघटना बळकट करा.
पंकज तांबे यांनी सन २००४ मध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘स्वराज्य संघटने’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्या शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे, संबंधित अधिकाऱ्यांना घटना स्थळी बोलावून प्रश्नांवर चर्चा करणे आणि प्रशासना कडून आवश्यक कार्यवाही करून घेण्यासाठी पाठपुरावा करणे, अशी त्यांची कार्यपद्धती राहिली. त्यामुळे अल्पावधीतच रायगड जिल्ह्यात त्यांची शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. शेती क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी तांबे यांनी विविध मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन केले. पुणे तसेच राज्यातील विविध ठिकाणी आयोजित कृषी मेळाव्यांना उपस्थित राहून तेथील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन बियाणे, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धती आणि कृषी क्षेत्रातील प्रयोग यांची माहिती रायगड मधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.
कोकणातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेती अधिक आधुनिक व व्यावसायिक पद्धतीने करता यावी, यावर त्यांचा सातत्याने भर राहिला. आधुनिक कृषी अवजारे, नांगरणी पासून पेरणी पर्यंतच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती, पशुपालन, दुग्धव्यवसाय तसेच कृषी पूरक व्यवसाय यांचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. शेतमालाला योग्य व हमीभाव मिळावा, या मागणी साठीही त्यांनी माणगाव येथे कृषी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात विविध पशुधन, पक्षी, दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रम तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक यंत्रसामग्री व अवजारांचे प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव आणि आधुनिक शेतीच्या प्रयोगांची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला. शेतकरी, शेती आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी असलेली ही नाळ कायम ठेवत तांबे यांनी सामाजिक कार्याला राजकीय कामाची जोड देण्याचा निर्णय घेत सन २०१४ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी काँग्रेसचे काम केले. त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
मात्र, गेल्या कांही काळातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांवर व कार्यप्रणालीवर विश्वास व प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पंकज तांबे यांनी स्पष्ट केले. आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या या प्रवेशा वेळी भाजप नेते व म्हाडाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रायगडच्या ग्रामीण भागात शेतकरी प्रश्नांवर दीर्घकाळ काम केलेल्या पंकज तांबे यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय समीक्षक, विश्लेषकातून होत आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये असलेला त्यांचा संपर्क भाजपसाठी संघटनात्मक दृष्ट्या किती फायदेशीर ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.













































