जखमी भेकराला जीवदान; ग्रामस्थ, पशुवैद्यक आणि वनविभागाची तत्परता
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. १० – माणगाव तालुक्यातील साई गावात साई-वांजळोशी रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या भेकराला ग्रामस्थ, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जखमी झालेला हा भेकर (बार्किंग डियर) अंदाजे १२ ते १३ महिन्यांचा असल्याचे पशुवैद्यकीय तपासणीत समोर आले.साई गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर गजानन अधिकारी यांना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत हा भेकर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर जखमा झालेल्या असल्याने तो हालचाल करण्याच्या स्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सागर अधिकारी यांनी तातडीने साई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत डॉ. व्ही. एस. घुगे यांच्याशी संपर्क साधला.
त्यावेळी डॉ. घुगे हे चांदोरे येथे लसीकरणाच्या कामात होते. मात्र जखमी वन्यप्राण्याची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी भेकराची प्राथमिक पाहणी करून त्याची प्रकृती तपासली आणि तातडीने माणगाव वनविभागाला याबाबत माहिती दिली.वनविभागाला माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घुगे यांनी भेकराची सविस्तर तपासणी करून आवश्यक प्रथमोपचार केले. त्यानंतर साई गावातील ग्रामस्थांच्या मदतीने जखमी भेकर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढील आवश्यक कार्यवाही करून उपचार घेतलेल्या या भेकराला सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.वन्यप्राणी संकटात सापडल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला इजा न करता किंवा त्रास न देता तातडीने वनविभाग अथवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.
या बचावकार्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. घुगे, सामाजिक कार्यकर्ते सागर गजानन अधिकारी, दिपेश जंगम, अनिल लाड, हरीश चव्हाण यांच्यासह साई गावातील ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.तसेच माणगाव वनविभागाचे वनरक्षक संतोष दामोदर पिंगळा, वनरक्षक पवन शंकर चौधरी आणि वनसेवक गणेश शांताराम शिर्के यांनीही तत्परतेने कार्यवाही करत जखमी भेकराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सहकार्य केले.
जखमी वन्यप्राणी दिसताच त्याकडे दुर्लक्ष न करता सागर अधिकारी यांनी दाखविलेली तत्परता, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने केलेले उपचार आणि वनविभागाने केलेली कार्यवाही यामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला. ग्रामस्थ, पशुवैद्यक आणि वनविभाग यांच्या समन्वयातून झालेल्या या कार्यवाहीचे परिसरातून कौतुक होत आहे.











































