पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २६ – राज्यात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फक्त सहा बाय आठ फूट आकाराच्या छोट्याशा वडापाव, पॅटिस व पकोडे विक्रीच्या टपरीला तब्बल पाच हजार रुपयांचे वीजबिल आल्याने टपरीधारक मारुती गोविंद पड्याळ हे हवालदिल झाले आहेत.
सदर टपरीमध्ये केवळ दोन एलईडी बल्ब असून तेही संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच सुरू असतात. तसेच एक घरगुती छोटा फ्रीज आणि एक आईस्क्रीम फ्रीज आहे. त्यापैकी आईस्क्रीम फ्रीज पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे जून महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्याचे टपरीधारकांचे म्हणणे आहे. असे असताना मे महिन्याचे जून महिन्यात सुमारे पंधराशे रुपयांचे वीजबिल आले, तर जून महिन्याचे थेट ३४४ युनिट वापर दाखवत ₹५,०५० इतके बिल आकारण्यात आले.
“आमच्या टपरीत दोन बल्ब आणि एकच छोटा फ्रीज सुरू असताना ३४४ युनिट वीज वापर कसा झाला, हेच समजत नाही. एवढे बिल भरणे आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकासाठी मोठे आर्थिक ओझे आहे. त्यामुळे निर्णय करून बिलाची योग्य ती पुनर्तपासणी करावी,” असे टपरीधारक मारुती गोविंद पड्याळ यांनी सांगितले.
“स्मार्ट मीटरचा हा चमत्कार म्हणायचा का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एका छोट्याशा ग्रामीण टपरीला एवढे अवास्तव बिल कसे येऊ शकते? एवढा व्यवसायही होत नसताना हे बिल कसे भरायचे, असा प्रश्न मारुती पड्याळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी महावितरणकडे लेखी अर्ज करून मीटरची तांत्रिक तपासणी, रीडिंगची पडताळणी आणि वाढीव बिलाची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. मात्र अर्ज दिल्यानंतरही “बिल भरावेच लागेल” असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्रामीण भागात अनेक ग्राहकांकडून वाढीव बिलांच्या तक्रारी येत असल्याची चर्चा असून, महावितरणने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ग्राहकाला न्याय द्यावा, अशी मागणी कोलमांडले परिसरातील नागरिकांकडून होत आहे. गरीब व लघु व्यावसायिकांना विकासाच्या नावाखाली आर्थिक धक्का बसत असेल, तर स्मार्ट यंत्रणेचा नेमका फायदा कोणाला, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.












































