IPS सत्य साई कार्तिक ( अप्पर पोलीस अधीक्षक – गडचिरोली )
उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून देशभरात नाही तर जगभरात ओळखले जाणारे सत्यसाई कार्तिक गतवर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाले. लोणावळा येथे त्यांना सहायक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. अल्पावधीतच कार्तिक यांनी गुन्हेगारी जगताची पाळेमुळे नष्ट करायला सुरुवात केल्याने लोणावळा पोलिसांची कामगिरी उजळली आहे. एक उत्तम क्रिकेटर उत्तम प्रशासक देखील असतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण.
सत्यसाई कार्तिक मधिरा यांचा जन्म तेलंगणातील हैदराबादचा. शालेय शिक्षणही हैदराबादमध्येच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी तेथील स्थानिक महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यांना बालपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड. अभ्यासात हुशार असलेल्या कार्तिक यांचा क्रिकेटच्या मैदानावरील झंझावातही कमालीचा होता. रणजी स्पर्धेत १९ वयोगटाखालील संघात त्यांची तेलंगणाच्या संघात निवड झाली. तेथील चमकदार कामगिरीमुळेच त्यांना भारतीय क्रिकेट संघात देखील स्थान मिळाले. परंतु तरीही काहीतरी करायचं राहून जातंय असं त्यांना सारखं वाटायचं. यशस्वी क्रिकेटर असूनही जीवनातील काही स्वप्न सत्यात उतरत नसल्याची अपूर्णता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. विचाराअंती त्यांनी क्रिकेट करिअरला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी स्वत:ला यूपीएससीच्या तयारीत झोकून दिले. 
कार्तिक मधिरा यांनी जवाहरलाल नेहरू तांत्रिक विश्वविद्यालयातून (JNTU) संगणक विज्ञान अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. क्रिकेटरपासून आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच सरळ आणि सोपा नव्हता. खेळताना झालेली दुखापत आणि काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी आयपीएसच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले.
कार्तिक यांना यूपीएससीच्या पहिले तीन प्रयत्नांमध्ये सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला. परंतु ते खचले नाहीत. त्यांनी तयारी सुरूच ठेवली. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीचा त्यांना प्रत्यय आला. अखेर त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी २०१९ ची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यामध्ये १०३ वी रँक मिळविली. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना सोलापूरात प्रोबेशन मिळाले. तेथे उत्तम कामगिरी बजावल्यानंतर त्यांना पुण्यातील लोणावळा येथे नियुक्ती मिळाली. गुन्हेगारांचे कर्दनकाळ, कर्तबगार, स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय मिळाल्याची भावना लोकांमध्ये दृढ होते आहे. त्यामुळेच कार्तिक हे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना त्यांनी चाप लावला आहे. शांत, संयमी मात्र तेवढेच कार्यतत्पर अधिकारी म्हणून ते पोलीस दलात ओळखले जातात. रेव्ह पार्टी, हुक्का पार्टी, अवैध गुटखा, अवैध दारू, गांजा मटका कारवायांनी त्यांची कारकीर्द गाजते आहे. चुकीच्या माणसांचे समर्थन न करणे आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणे ही त्यांच्या कामाची पध्दत आहे. ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ असा संदेश ते कृतीतून देतात. जो निरपराध आहे त्याने वर्दीला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे ते स्वत: लोकांना सांगताना दिसतात.
कुरवंडे येथील बंगल्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बारबालांचा डान्स, लोणावळामार्गे होणारी कोट्यवधींच्या गुटख्याची वाहतूक रोखणे, वेहेरगाव येथील मटक्यावर धडाकेबाज कारवाई करून जप्त केलेला १७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल, चोऱ्या, घरफोड्यांसह खूनांच्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास ही साई कार्तिक यांच्या लोणावळ्यातील कामगिरीची निवडक उदाहरणे आहेत.


































