पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- मुंबई, पुणे शहरी ठिकाणांसारख्या धरतीवर दर्जेदार व उत्तम प्रकारचे शिक्षण देऊन माणगाव परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी, एमपीएससी आणि यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेणे हा उद्देश नजरेसमोर ठेऊन वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट रोहा यांच्या पुढाकाराने रोटरी प्रतिष्ठान खेड व एस. एस. निकम इंग्लिश स्कुल माणगाव यांच्या संयुक्त उपक्रमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता घडवून आणण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून या स्पर्धा परीक्षांच्या फाउंडेशन कोर्सचा सुरुवात एस. एस. निकम इंग्लिश स्कुल माणगाव येथे करण्यात येत असून या कोर्सच्या शुभारंभाचा कार्यक्रम सोमवार २० जून रोजी सायंकाळी ६ वा. कुणबी भवन माणगाव याठिकाणी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर माणगाव एज्युकेशन ट्रस्ट जेष्ठ संचालक सुभाष मेहता, संचालक ऍड प्रकाश ओक, ऍड राहुल ओक,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुका अध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, माणगाव एज्युकेशन ट्रस्ट चेअरमन डॉ केतन निकम, रोटरी प्रतिष्ठान खेड चे अध्यक्ष रोटे. बिपीन पाटणे, तहसीलदार दशरथ काळे, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, माणगाव मा. नगराध्यक्ष आनंद यादव, उपनराध्यक्ष हर्षदा सोंडकर, अजित दोशी,व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेष्ठ संचालक सुभाष मेहता यांनी केले. हा फाऊंडेशन कोर्स पुढील पाच वर्ष सातत्याने सुरु राहणार असून तो पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने माणगाव आणि इंदापूर परिसरात राबविला जाणार आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचा समावेश असून हा कोर्से इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असणारा आहे. शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या एस. एस. निकम स्कुल माणगाव या संस्थेने सन १९७८ पासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले आहे. या शिक्षण संस्थेतून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडून ते विद्यार्थी आज देशात, परदेशात चांगल्या पदावर काम करीत आहेत. माणगाव परिसरातील विद्यार्थी केवळ एमपीएससी व यूपीएससी परीक्षाच नव्हे तर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन त्यांनी आपल्या शाळेचे, महाविद्यालयाचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव उज्वल करावे या दृष्टीने आयोजकांनी हे महत्वपूर्ण व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पाऊल टाकले आहे. या उद्दिष्टांसाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा पुरविण्यास आयोजक कटीबद्ध आहे. हा सामूहिक पुढाकार ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या यशाची शक्यता वाढवणारा आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर विश्लेषणात्मक विचार, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण यांचा विकास या उपक्रमाद्वारे साध्य केला जाणार आहे.
ह्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना ना आदिती तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी प्रतिष्ठान खेड, आणि एस एस निकम स्कूल माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा फाऊंडेशन कोर्स चालू करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता ७वी ८ वी व ९ च्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने व पाया मजबूत झाल्याने त्यांना आगामी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणे सोपे होणार आहे. विविध क्षेत्रातील पूर्वपरीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये टिकाव धरून या कोर्स च्या माध्यमातून एकदा आय ए एस अधिकारी तयार व्हावा जेणेकरून त्याचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला मिळावे. ह्या कोर्स साठी नाममात्र वार्षिक फी आकारण्यात आली आहे. तसेच हा उपक्रम सलग ५ वर्षासाठी सुरू राहणार असून यामध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये माणगाव आणि तळा तालुका तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व माध्यमात शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेश घेऊन आपल्या उज्वल भविष्याचा पाया निर्माण करू शकतात असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ केतन निकम यांनी कार्यक्रमातील मान्यवरांची ओळख करून देत असताना ना आदिती तटकरे यांनी केलेल्या कामांची यशोगाथा सांगत माणगाव एज्युकेशन ट्रस्ट ला केलेले सहकार्य सांगत अनेक स्तुतिसुमने उधळत ऋणनिर्देश व्यक्त केले.
हा उपक्रम म्हणजे माणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनविणे तसेच आत्मनिर्भर आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज असे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीकोनातून एक ठोस पाऊल असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हि एक नामी संधी असून या संधीचा लाभ माणगाव परिसरातील ग्रामीण भागातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी प्रतिष्ठान खेड अध्यक्ष बिपीन पाटणे,माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.मदन निकम व सहकारी यांनी केले असून या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मो. नं. ८८३०७८२७०२/ ९५०३८९३४०१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




































