पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४-ही निवडणूक केवळ लोकप्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी आहे. शिवसेनेचे नेतृत्व सदैव जनतेच्या सुख-दुःखात सहभागी राहिले आहे. त्यामुळे लोकसेवी, सक्षम आणि कर्तव्यदक्ष उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तसेच माणगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी खरवली येथील सभेत दिले.
आगामी रायगड जिल्हा परिषद व माणगाव पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळाशेत जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार स्वाती अनिल नवगणे तसेच साई पंचायत समिती गणाच्या शिवसेना समर्थ अपक्ष उमेदवार रचना निलेश थोरे यांच्या प्रचारार्थ खरवली येथे दि. ४ फेब्रुवारी रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प सभा उत्साहात पार पडली. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेदरम्यान विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत पक्षाची ताकद अधिक वाढवली.
ते पुढे म्हणाले की, पेण तर्फे तळे येथे प्रस्तावित शिवस्मारकाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. तळाशेत जिल्हा परिषद गट आणि साई पंचायत समिती गणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ तसेच साई पंचायत समिती गणामध्ये “कप-बशी” या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना ऐतिहासिक बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी निलेश थोरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कुणबी समाजाचा एवढा पुळका आहे, कुणबी समाजावर जर हे खरंच एवढं राजकारण करतात, तर मग आमचे अनिल नवगणे कोणत्या समाजाचे आहेत? तुम्हाला समाजाला जर खरंच मतदान करायचं असेल, खरंच त्यांना समाजाची एवढी काळजी असेल तर मी माझ्या ह्या निवडणुकीतून माझी पत्नी माघार घ्यायला तयार आहे. त्यांनी सुद्धा बिनशर्त या ठिकाणी अनिल नवगणे यांना पाठिंबा द्यावा आणि कुणबी समाजाचा म्हणून या ठिकाणी दोन्ही समाजाचे नेतृत्व स्वीकारावे. विरोधकांनी समाजाच्या नावाने स्वतःची पोटं भरलीत, गाड्या घेतल्या, माड्या बांधल्या. त्या समाजासाठी यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं. आम्ही समाजाच्या नावावर मतं मागतच नाही. आम्ही आमच्या कामावर आणि आमच्या मेहनतीच्या नावावर या ठिकाणी मतं मागतोय. समाजाच्या नावावर यांची फक्त धुळफेक आहे. गेली सात वर्ष तुम्ही मतदारसंघाला पोरकं ठेवलं होतं. जेव्हा निसर्ग वादळ, कोव्हिड कोविड आला, जेव्हा जेव्हा या साही पंचायत समिती गणातील सर्व लोकांवर संकट आलं, तेव्हा हा निलेश थोरे त्यांच्या घरातला मुलगा म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होता. मागील तीन वर्षात आम्ही या विभागता साडे तीन कोटींची कामे केली आहेत. त्यामुळे येत्या ७ तारेखाला स्वाती अनिल नवगणे व रचना निलेश थोरे यांच्यावर मतदानाचा पाऊस पडून विजयी करा, असे आवाहन थोरे यांनी केले.
यावेळी संपर्कप्रमुख अरुण चाळके, माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, महिला जिल्हा संघटिका नीलिमा घोसाळकर, तालुका प्रमुख ॲड महेंद्र मानकर, निलेश थोरे , परेश सांगळे, शिवसेना व अपक्ष युती पदाधिकारी व कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.



































