४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक; १२५ पैकी ११२ गुणांची विक्रमी कामगिरी; माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पोलीस प्रवाह न्युज
निमगाव, दि. ४- येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत संजयमामा शिंदे यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (शॉटगन) या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
सदर स्पर्धा दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून यशवंत शिंदे यांनी आपल्या नेमबाजी कौशल्याची आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. या स्पर्धेतील त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडीत काढत १२५ पैकी तब्बल ११२ गुण मिळवले. या विक्रमी कामगिरीमुळे त्यांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले असून, सुवर्णपदकावरही आपली मोहोर उमटवली आहे. राज्यस्तरावर अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे यशवंत शिंदे हे निमगाव (टें.) सह माढा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहेत.
या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उपनगर जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, उपाध्यक्ष रमेश कुसळे आणि जनरल सेक्रेटरी शीला कानुंनगो व तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते यशवंत शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यशवंत शिंदे हे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांचे सुपुत्र आहेत. राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे निमगाव (टें.), माढा तालुका तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निमगावच्या मातीतून राज्यस्तरावर सुवर्णझेप! सुवर्णपदकासह विक्रमाची नोंद करणाऱ्या यशवंत शिंदे यांच्या या देदीप्यमान यशाने तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.












































