पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव , दि. ४ – माणगाव तालुक्यातील बोरघर (पो. पेण/तळे, जि. रायगड) येथे परंपरेने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे संपूर्ण पारायण यंदा ३९ व्या वर्षात अत्यंत भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि आत्मिक उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते ०४ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या अध्यात्मिक पर्वामुळे केवळ गावच नव्हे, तर परिसरातील असंख्य भाविक भक्तिरसात चिंब झाले.माणगाव तालुक्यातील मोठा, मानाचा व श्रद्धेचा आधारस्तंभ ठरलेला हा सप्ताह सुमारे चार दशकांपासून अखंड सुरू आहे. वारकरी सांदाय मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ व जय हनुमान संघ, बोरघर यांच्या सहकार्याने या सप्ताहाचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या हरिजागरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांतून वारकरी संप्रदायाची शुद्ध, साधी आणि निर्मळ परंपरा जपली गेली. दिवसभर सुरू असलेला हरिनामाचा गजर संपूर्ण बोरघर परिसराला भक्तिमय करून गेला.
या ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तनकारांनी आपल्या ओघवत्या वाणीने भाविकांच्या मनावर गूढ आध्यात्मिक छाप उमटवली. ह.भ.प. महेश महाराज कळसे (लातूर), ह.भ.प. गणेश महाराज नलावडे (आंबेवाडी–कोलाड), ह.भ.प. उत्तम महाराज वडे (देवाची आंबडी), ह.भ.प. नित्यानंद महाराज मांडवकर (चणेर–रोहा, रायगड), ह.भ.प. प्रविण महाराज दुर्गिंग पाटील (शिवचरित्रकार, श्री टॉकीज फेम–विजापूर) तसेच ह.भ.प. अद्वैताई तावडे (सोनी मराठी फेम, संतसाहित्याच्या युवा अभ्यासिका–मंचर) यांच्या कीर्तनांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. कीर्तनांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर झाला. भक्ती म्हणजे केवळ विधी नव्हे, तर ती जगण्याची एक सुंदर पद्धत आहे, हा संदेश प्रवचनांतून ठळकपणे मांडण्यात आला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने दररोज उपस्थित राहत या भक्तिसोहळ्याचे साक्षीदार झाले.
सप्ताहाची सांगता रविवार, दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत टाळ–मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात भव्य दिंडी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह.भ.प. माधव महाराज कळसे (लातूर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांच्या ओघवत्या वाणीतील नाममहात्म्याने भाविक भारावून गेले. दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविकांनी समाधान, समरसता आणि भक्तिभावाने घेतला. हरिपाठ, हरिजागर आणि अभंगगायनामुळे संपूर्ण बोऱघर परिसर जणू भक्तीच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ व जय हनुमान संघ, बोऱघर यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतांचे आदरातिथ्य, भाविकांची सोय आणि महाप्रसादाची सेवा अत्यंत तन्मयतेने व शिस्तबद्धरीत्या पार पाडली.
या अखंड हरिनाम सप्ताहातून भक्ती, ज्ञान आणि माणुसकीचा अमूल्य संदेश समाजापर्यंत पोहोचला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. परंपरेने सुरू असलेला हा भक्तिपर्व भविष्यातही अखंडपणे सुरू राहावा, अशी सामूहिक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




































