पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि ३ – भारतीय संविधानाचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी माणगाव तालुक्याच्या शिक्षण विभागाने हाती घेतलेला ‘घर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम केवळ यशस्वीच ठरला नाही, तर आता तो दरवर्षी राबवला जाणार आहे. २६ जून रोजी, ‘सामाजिक न्याय दिनी’ आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत, ना. म. जोशी विद्याभवन गोरेगाव येथे पार पडलेल्या भव्य गौरव सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रासाठी एक नवा आदर्श घालून देत आहे.
सहभाग आणि सन्मानाचा सोहळा
या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या संविधान गुणगौरव परीक्षेत हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या परीक्षेत तालुकास्तरावर पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. याव्यतिरिक्त, क्रीडा व नवोदय परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांनाही सन्मानित करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
रायगड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुनिल भोपळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांच्यासोबतच, माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट, कुमार खामकर, धुळदेव कोळेकर, संजय पालांडे, शंकर शिंदे यांसह अनेक केंद्रप्रमुख, शिक्षक, साधन व्यक्ती, तसेच चारिझेन फाऊंडेशनचे पदाधिकारी कॅप्टन एन. एस. रंधावा, सतीश काळे, किशोर झेमसे हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ना. म. जोशी विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ईशस्तवन व स्वागतगीत मनमोहक ठरले, तर संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाला ऊर्जा मिळाली. मान्यवरांचे स्वागत रोप व पुस्तक देऊन अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
संविधानाचा जागर आता निरंतर
गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली आणि एक महत्त्वपूर्ण घोषणा केली: “हा उपक्रम केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवण्यासाठी ‘घर घर संविधान’ जनजागृतीचा उपक्रम माणगाव तालुक्यात दरवर्षी राबवण्यात येईल.” या वर्षापासून, म्हणजेच ५ जुलैपासून, हा उपक्रम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या यशाचा अहवाल पुस्तक आणि व्हिडिओ स्वरूपात प्रकाशित करण्यात आला, ज्यामुळे या उपक्रमाची व्याप्ती आणि भव्यता स्पष्ट झाली. संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी आपल्या मनोगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी संविधान कसे वरदान ठरवले, याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “एक महिला अधिकारी म्हणून आदरणीय सुरेखा तांबट मॅडम यांनी या संविधानाचे ऋण फेडण्याचे कार्य केले, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.” त्यांनी हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्याची विनंती शिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांनी केली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव
‘घर घर संविधान’ उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविल्याबद्दल जि. प. शाळा कोस्ते बुद्रुक, जि. प. शाळा होडगाव, ना. म. जोशी विद्याभवन गोरेगाव व जे. बी. सावंत विद्यालय लोणेरे या शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. याव्यतिरिक्त, संविधान गुणगौरव परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी करून घेतल्याबद्दल गोरेगाव येथील ए. के. आय. उर्दू शाळेचाही सत्कार करण्यात आला. संविधान गुण गौरव परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना माणगाव नागरिक सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तर चारिझेन फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात प्रथम तीन क्रमांक मिळाविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात ‘संविधान’ विस्ताराची नांदी
अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी सुनील भोपळे साहेबांनी माणगावच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. माणगावने घालून दिलेल्या आदर्शानुसार, हा उपक्रम आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले, ज्यामुळे या जनजागृतीला व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माणगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी, सर्व साधन व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. योगेश शेलार सर व सुधा मोरे मॅडम यांनी सूत्रसंचालन अतिशय नियोजनबद्ध केले, तर केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘घर घर संविधान’ या उपक्रमामुळे संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांची जाणीव नव्या पिढीमध्ये खोलवर रुजण्यास निश्चितच मदत होईल. माणगावने सुरू केलेला हा जागर आता जिल्ह्याभरात पसरून, महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीत महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा आहे.


































