पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २०- तालुक्यातील लोणेरे येथील लॉजिंगमध्ये तरुणीची निर्घुण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तरुणीच्या हत्याकांडाने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत ओमकार रेसिडेन्सी येथे दि. २० एप्रिल रोजी रुम नंबर १०१ मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे २२ वर्षे असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अज्ञात आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून फरार झाला आहे. लोणेरे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नेमकी ही हत्या कोणत्या प्रकरणातून झाली याचा तपास गोरेगाव पोलिस करत आहे.




































