पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील कालव्याच्या जागेत उभारण्यात आलेली कचराकुंडी तातडीने हटविण्याची मागणी शिवसेना युवा नेते राकेश गुलाबराव पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत मोर्बाचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कालव्याच्या जागेत तसेच जिल्हा परिषद सदस्य अस्लमभाई राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कचराकुंडी बांधण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना सदर कचराकुंडीतील दूषित पाणी कालव्यात मिसळण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी दूषित होऊन सुर्लेसह परिसरातील गावांमध्ये साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
वाहत्या पाण्याच्या स्रोताजवळ उघड्यावर कचरा साठवणे हे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत संबंधित कचराकुंडी तात्काळ बंद करून कायमस्वरूपी हटविण्यात यावी व पर्यायी ठिकाणी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, अशी मागणी राकेश पवार यांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने लोकहिताच्या दृष्टीने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.













































